कुर्डूवाडी ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट कुर्डूवाडी शहरात नगरपालिका निवडणूक एकत्र लढवत असल्यामुळे दोन्ही शिंदे एकत्र लढत आहेत. ही एकी भविष्यातील परिवर्तनाची नांदी असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे गुरुवारी येथे केले. प्रदेशध्याक्षांनी केलेल्या विधानांनी भविष्यात शिंदे शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. येथील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेप्रसंगी प्रदेशाध्यक्ष, आ. शिंदे बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष, आ. शिंदे म्हणाले, विजयसिंह मोहिते-पाटील पालकमंत्री होते. त्यांच्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व करणारा नेता जिल्ह्यात उरलेला नाही. आता काही मंडळी त्यांनाही घेरण्याचे काम करत आहेत. राजकारणात आज काल लोक कामापुरता उपयोग करून घेतात, नंतर त्यांना कलाटणी देतात. कुर्डूवाडी शहर विकासाचे प्रश्न मी विधानसभेत लावून धरतो मीच सोडवितो, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
खा. मोहिते पाटील म्हणाले, कुर्डूवाडी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी योजना उजनी येथून आम्ही नक्की करू. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या भरावाच्या जागेवर भव्य शॉपिंग सेंटर उभारून तरुणांना रोजगार देऊ. गावाला जोडणाऱ्या दोन ओढ्यांवर उंच पूल करू. यामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. शहरात सुंदर बगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, स्पर्धा परीक्षांसाठी लायब्ररी आदी शहर विकासाची कामे अकलूज प्रमाणे करू.
धनुष्यबाण व तुतारी एकत्र येण्याचा हा ‘कुर्डूवाडी पॅटर्न’ आहे. शिवसेनेकडे उद्योग मंत्री आहेत. त्यांच्याकडून एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणू. पाणीपुरवठा मंत्र्यांकडून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करू. परिवहन मंत्र्यांकडून कुर्डूवाडीचे एसटी स्टँड खासगी तत्त्वावर मोठे करून व्यापारी गाळे काढू, नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे शहराचा विकास केवळ शिवसेनाच करू शकते, असे शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी सांगितले.