सोलापूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात एक दिवसीय कौटुंबिक पर्यटनासाठी बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील वन विभागाच्या विस्तीर्ण गवताळ सफारीला भेट देता येईल. येथील हरीण, ससा या वन्य प्राण्यांसह पक्षीही जवळून पाहता येणार आहे.
येथील गवताळ प्रदेश हा विस्तीर्ण 262 हेक्टर क्षेत्रात आहे. याचा फेबु्रवारी महिन्यात शुभारंभ झाला. तेव्हापासून आजतागायत येथे जवळपास तीस वाहनांच्या माध्यमातून 150 हून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. येथे पर्यटकांना वन्य प्राण्यांसह पक्षीही जवळून पाहता येतात. शिवाय, मधल्या काळात येथे परदेशातील पर्यटकांनीही भेटी दिलेल्या आहेत. शहरापासून जवळच असलेल्या या गवताळ प्रदेशाचा सफर हा एक दिवसाचा आनंददायी असणार आहे. येथे वन विभागाकडून रस्त्यांसह अन्य कामे केलेली आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांना सहजा-सहजी सफर करता येणार आहे. लहान मुलांना निसर्ग अनुभवता येईल, असे पर्यटन केंद्र आहे.
गवताळ प्रदेशाची संपूर्ण माहिती पर्यटकाला व्हावी, यासाठी वन विभागाकडून गाईड नेमला आहे. पर्यटकांना येथील माहिती सहज होणार आहे. मधल्या काळात ऑस्ट्रेलियाच्या पर्यटकांनीही भेटी दिल्या आहेत.- रोहितकुमार गांगर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी