सोलापूर : भाजपने पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि बंडखोरी केलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, सोलापूर शहरातील 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, राजू आलूरे, मेनका राठोड यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ही कारवाई शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केली आहेत.
सोमवारी (दि. 5) भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चोवीस तासांत बंडखोरी मागे घेऊन कामाला सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानुसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत यंदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने इच्छुक कार्यकर्ते पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक धोरणानुसार आणि सखोल विचाराअंती, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व शहरातील भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे 102 अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
उमेदवार निवडीदरम्यान सर्व इच्छुकांना समाधान
देणे शक्य नसल्याने, पक्षाच्या वतीने नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पक्षाच्या शिस्तीला न जुमानता काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष अथवा इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तसेच काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे पक्षशिस्त भंग केल्याबद्दल अशा एकूण 28 कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तडवळकर यांनी दिली. भारतीय जनता पार्टी संघटनात्मक शिस्त, विचारधारा आणि अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी कटिबद्ध असून, कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
हे आहेत निलंबित कार्यकर्ते
बाबुराव जमादार, शर्वरी रानडे, अमरनाथ बिराजदार, काशिनाथ झाडबुके, डॉ. राजेश अनगीरे, निर्मला तट्टे, निर्मला पासकंटी, प्रकाश राठोड, मंजुषा मुंडके, मेनका राठोड,राजशेखर येमूल, राजश्री चव्हाण, राजू आलुरे, राजेश काळे, रुचिरा राजेंद्र मासम, रेखा लहू गायकवाड, विजय इप्पाकायल, विठ्ठल कोटा, रश्मी विशाल गायकवाड, विशाल गायकवाड, वीरेश चडचणकर, वैभव हत्तुरे, शीतल गायकवाड, श्रीनिवास आशप्पा करली, श्रीनिवास पोतन, श्रीशैल हिरेपट, सीमा महेश धुळम, स्नेह विद्यासागर श्रीराम.