सोलापूर : सोलापूरहून गोवा, मुंबईला विमानसेवा सुरू झाली, लवकरच बंगळूरू, तिरुपतीची विमानसेवा सुरू होईल, आयटी पार्कचा प्रश्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मार्गी लावला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 6 मधील भाजप उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी 9 वाजता देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, मनीष देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टीकडून सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर निवडणूक रिंगणात आहेत. लाडक्या बहिणींना सन्मानाने उभे राहण्याचे काम भाजपने केले आहे. प्रत्येक महिलांना 1500 रुपये महिना त्यांच्या खात्यावर जमा केल्याने त्यांच्या संसाराला हातभार लागला आहे. समातंर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, दररोज पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत पाईपलाईन नव्याने टाकण्यात येणार आहे, त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
विकासकामांसाठी, युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. ते नेतृत्व भाजपकडे आहे. त्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यासाठी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.