पंढरपूर : देशातील नागरिकांनी सोने खरेदी करू नये, पेट्रोल-डिझेल याचा वापर कमी करावा, खर्चावर नियंत्रण ठेवावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे. यास सर्वसामान्य जनतेमधून प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाकडे भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. वाखरी ते पंढरपूर या 7 कि.मी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर शहरातही बॅनरबाजी करण्यात आल्याने शहराला विद्रुपीकरणाचे रुप आल्याचे चित्र दिसून आले. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याने नागरिकांमधून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना खर्चामध्ये कपात करा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला अनेक देशभक्त नागरिक प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनानेही काटकसरीने कारभार करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी वाखरी ते पंढरपूर आठ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. यासाठी लाखो रुपये उधळण करण्यात आली असल्याची चर्चा होत आहे. हा खर्च वायफट असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाकडे आ. समाधान आवताडे यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजप त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.