सोलापूर : आठवडाभरापासून सोलापुरात बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. शहरातील किल्ला परिसर, छत्रपती संभाजी तलाव परिसरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र कावळ्याचे आव्हान कायम आहे. कावळ्यांचे मृत्युही होत आहेत. चिकन शॉपवरील बंदीबाबत निर्णयाकडे विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात किल्ला बाग आणि छत्रपती संभाजी तलाव परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या कावळ्यांचा सॅम्पल तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आले. तेथील रिपोर्ट पॉजेटिव्ह आल्यानंतर या दोन्ही परिसरातील चिकन शॉप बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शुन्य ते 1 किलोमीटर आणि 1 ते 10 किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले. या क्षेत्रातील घरगुती व दुकानातील कोंबड्यांचे सर्व्हेक्षण केले होते. भोपाळ प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. घरगुती व दुकानातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, निर्बंध कायम आहे. जिल्हाधिकार्यांनी आदेश लागू करताना कोंबड्या अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत किंवा 4 एप्रिलपर्यंत दोन्ही तलाव परिसरात निर्बंध लावण्यात आले आहे. चिकन शॉप बंद करण्यात आले होते. सॅम्पलचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे अन्न औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
घरगुती आणि चिकन सेंटरमधील कोंबड्याचे घेतलेले सॅम्पल हे निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी बंद चिकन शॉप सुरु करण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज या अहवालावर चर्चा होणार आहे. परंतु, कावळे चिकन शॉपच्या परिसरात वावरत असल्याने कावळ्यातील फ्लूचा संसर्ग कोंबड्यांना होण्याची भिती कायम आहे.