biometric machine 
सोलापूर

Biometric Attendance in Colleges |महाविद्यालयांत होणार बायोमेट्रिक हजेरी

कॉलेजमधील नावपुरती हजेरी, कोचिंग क्लास नेटवर्कला लगाम लागणार

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : गणेश गोडसे

अकरावी-बारावीला प्रवेश घ्यायचा कनिष्ठ महाविद्यालयात आणि शिकायचं मात्र खासगी क्लासमध्ये, ही सध्या राज्यात बोकाळलेली 'इंटिग्रेटेड एज्युकेशन' ची बनावट पद्धत आता मोडीत निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण राज्यातील ९,५११ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू करण्याचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभाग तयार करत आहे. या निर्णयामुळे कॉलेज आणि कोचिंग क्लासेस यांच्या संगनमताने चालणाऱ्या साखळीला चाप बसणार आहे.

पुजारी वॉच सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार अलीकडे दहावीनंतर अकरावीला ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रवेश घेतले जातात. मात्र, प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी कॉलेजकडे साधे फिरकतही नाहीत. नीट, जेईई आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांनी अगोदरच एखाद्या मोठ्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेला असतो. काही कनिष्ठ महाविद्यालये अशा क्लासेसशी हातमिळवणी करून 'इंटिग्रेटेड' अभ्यासक्रम चालवतात. विद्यार्थी कॉलेजला न येता थेट क्लासमध्येच बसतो. हजेरी मात्र कॉलेजच्या दप्तरी लागते अशी पद्धत चालत असायची.

काही संस्था केवळ क्लास चालवण्यासाठी महाविद्यालयाचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाऐवजी मार्काची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे सगळीकडेच महाविद्यालयातील शिक्षणाचा मूळ उद्देशच बाजूला पडला असल्याचे चित्र आहे.

नव्या प्रस्तावानुसार कनिष्ठ महाविद्यालयातील किमान ७५ टक्के हजेरी सक्त्तीची करण्यात येणार आहे. दैनिक बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असेल. जर हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी भरली, तर विद्यार्थ्याला थेट बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांची कॉलेजमधील नियमित उपस्थिती वाढेल आणि वर्गातील अध्यापनाला महत्त्व मिळेल, असा शिक्षण विभागाचा व जाणकारांचा दावा आहे.

ही संपूर्ण प्रणाली शिक्षण संचालकांच्या कार्यालयाशी जोडली जाणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची उपस्थितीही डिजिटल पद्धतीने तपासली जाईल. वेळेनुसार स्वयंचलित हजेरी नोंद होईल. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक गैरहजर राहिल्यास त्याची त्वरित सूचना संबंधितांना आणि वरिष्ठ कार्यालयाला मिळेल. उपस्थितीचा ऑनलाईन अहवाल उपलब्ध होणार असून संस्थास्तरावर नियमित उपस्थितीचे निरीक्षण केले जाणार आहे.

कोचिंग क्लासेसचे वाढते प्रस्थ आणि महाविद्यालयांचे 'प्रवेश केंद्र' होणे हा गेल्या दशकभरातील चिंतेचा विषय बनला आहे. नीट, जेईईच्या रॅट रेसमध्ये विद्यार्थ्यांचे बालपण, वर्गातील गप्पा, क्रीडा आणि सर्वांगीण विकास हरवत चालला आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे विद्यार्थी वर्गात येईल, पण केवळ हजेरीने शिक्षणाचा दर्जा सुधारेल का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षकांनीही वर्गात नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याची तयारी ठेवली पाहिजे. अन्यथा विद्यार्थी शरीराने वर्गात आणि मनाने क्लासमध्ये असेल.

यशस्वी अंमलबजावणी आणि त्यासोबत शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर दिला, तरच या निर्णयाचे खरे सार्थक होईल. शासनाच्या मंजुरीनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे.

क्लासेस व महाविद्यालयांचे नेटवर्क

राज्यातील काही कनिष्ठ महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस यांचे नेटवर्क आहे. या सर्व कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसवण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT