कामती : मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर (बेगमपूर) येथील गणेश सूर्यकांत भोई आणि महेश सूर्यकांत भोई या दोन भावांनी पारंपरिक वाद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या भोपळ्याच्या शेतीतून अनोखा व्यवसाय उभारला असून लाखोंची कमाई करत इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
भोई कुटुंबीयांकडे आजोबा-पणजोबांपासून भोपळ्याची शेती करण्याची परंपरा आहे. या परंपरेला आधुनिकतेची जोड देत गणेश व महेश यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून वाद्य निर्मितीसाठी लागणारे विशेष भोपळे पिकवण्यास सुरुवात केली. तंबोरा, एकतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांसाठी लागणाऱ्या या भोपळ्यांना पंढरपूरसह राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
स्थानिक बाजारपेठेबरोबरच इतर राज्यांतूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढत असून दरवर्षी लाखोंची उलाढाल होत आहे. यावेळी भोई बंधूंनी, फक्त नोकरीसाठी शिक्षण न घेता व्यवसाय, शेतीतही शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होता े व शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, असे सांगितले.
गतवेळी सहा लाखांचे उत्पन्न
योग्य आकार, दर्जा आणि टिकाऊपणा मिळावा, यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करून त्यांनी उत्पादन वाढवले. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय आज मोठ्या उत्पन्नाचे साधन ठरला आहे. मागीलवर्षी भोई कुटुंबीयांना या व्यवसायातून तब्बल सहा लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादनात काहीशी घट झाली असली, तरी खर्च वजा जाता समाधानकारक नफा मिळाला.