सोलापूर : उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी, बाळगी, टाकळी, बुरुर, हत्तरसंग कुडल, तर अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव, कलकर्जाळ, शेगांव, धारसंग, आळगे, खानापूर आदी गावांतील नदीकाठच्या शेतकर्यांना तडाका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे हत्तरसंग कुडल संगम येथील संगमेश्वर मंदिराच्या पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही बाजूला पाण्याने वेढा घातला आहे. मंदिर परिसरातील संगम घाटावर सुमारे तीस फुटांहून अधिक पाणी आले आहे.
कुडल येथे भीमा आणि सीना या दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने भीमा नदीतील पाणी सीना नदी पात्रात बॅकवॉटरचे पाणी शिरले आहेत. शेगांव येथील महेश पाटील, अप्पाराव पाटील यांच्यासह आदी शेतकर्यांच्या शेतातील केळीच्या बागेत पुराचे पाणी शिरल्याने आतोनात नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेले उडीद पिके ही पाण्यात वाहून गेली आहे. शेतकर्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. तर पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक शेतकर्यांनी आपले विद्युत मोटारी या टॅ्रक्टरद्वारे पाण्याच्या बाहेर आणावे लागले.
अक्कलकोट तालुक्यातील भीमा आणि सीना नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतकर्यांच्या केळी, ऊस, उडीद, तूर, कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करून शेतकर्यांनी मदत मिळावी. रविकांत कुरे, शेतकरी, खानापूर
भीमा नदीवरील भंडारकवठे-गोविंदपूर, औज, चिंचपूर, बरुर, आळगे, खानापूर ही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने कर्नाटकातील गावांशी संपर्क तुटला आहे. हत्तरसंग कुडल जवळील सीना नदीवरील कलकर्जाळ बंधारा पाण्याखाली आहे. सीना नदीवरील कोर्सेगांव येथील बंधार्यावरून पाणी वाहू लागल्याने तो वाहतुकीसाठी बंद होऊन दक्षिण सोलापूरशी संपर्क तुटला आहे.