तुळजापूर : यंदा श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव नऊ ऐवजी दहा दिवस साजरा होत असून, या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला दहा माळा चढवून अकराव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरी होत आहे. नवरात्र महोत्सवात यावर्षी तिसरी माळ 24 व 25 सप्टेंबरला दोनदा आल्याने विजयादशमी (दसरा) गुरुवारी 2 ऑक्टोबरला साजरी होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवापूर्वीच्या मोह निद्रेस भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमीला (रविवार,14 सप्टेंबर) सायंकाळी सुरुवात होत आहे.यंदा मातेची मूर्ती आठ निद्रा पूर्ण घेवून नवव्या दिवशी सिंहासनावर आरूढ होणार आहे.मातेच्या नऊ दिवसाच्या निद्रेनंतर आश्विन शुध्द प्रतिपदेला (सोमवार,22सप्टेंबर) मुख्य मूर्ती पहाटे सिंहासनाधिष्ठीत होत असून त्याच दिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात होणार आहे.
येत्या 22 ते 1 ऑक्टोंबर दरम्यान मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव पार पडणार असून ललितापंचमी पासून मातेच्या पाच विविध रूपातील विशेष अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहेत.30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्ठमी असून त्यादिवशी मंदिरातील होमकुंडावर दुपारी 1 वाजता वैदिक होमहवनास प्रारंभ होवून सायंकाळी 6.10 वाजता पूर्णाहुती सोहळा पार पडणार आहे. 1 ऑक्टोंबर रोजी महानवमीला या होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी पार पडून नगर व बुर्हानगर येथून येणार्या पलंग- पालखीची शहरात मिरवणूक पार पडणार आहे.
लाखों भाविकांसाठी दहा दिवस छबिना मिरवणुकीची पर्वणी!
शारदीय नवरात्रौत्सवामध्ये दररोज सायंकाळी मातेची विविध वाहनांवर छबिना मिरवणूक पार पडणार असून, ही लाखो भाविकांसाठी एक नामी पर्वणीच ठरणार आहे. मातेचे शिबिकारोहण, मंदिराभोवती प्रदक्षिणा व सीमोल्लंघन तसेच सार्वत्रिक सीमोल्लंघन 2 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर मातेची श्रमनिद्रा सुरू होवून 6 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. पाच दिवसांची निद्रा 7 ऑक्टोंबर रोजी पूर्ण होवून मुख्य मूर्तीची सिंहासनावर. प्रतिष्ठापना होवून मंदिराची पौर्णिमा साजरी होणार आहे. याचदिवशी रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्या दाखल होत असून, या काठ्यांसह मातेची छबिना मिरवणूक काढण्यात येवून मंदिर परिसरात महंतांकरवी जोगवा मागितला जाणार आहे. 8 ऑक्टोबर रोजीही काठ्यांसह मातेचा छबिना मिरवणूक पार पडणार असून, अन्नदानाने (महाप्रसाद) यात्रेची सांगता होणार आहे.