तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात बुधवारी सकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य मूर्तीस पंचामृत अभिषेक व नित्योपचार पूजेनंतर मूर्तीस सप्तरंग लावून रंगपंचमीचा पारंपरिक सण साजरा करण्यात आला. मातेच्या नित्य पूजेची घाट दिल्यानंतर सकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य मूर्तीस पंचामृत अभिषेक घालून देवीस वस्त्रालंकार चढविण्यात आले.
भक्तांनी व पुजारीवृदांनी आणलेला सप्तरंग श्रीतुळजाभवानी मातेच्या मुखास, व अंगास लावून एकमेकांनी मुख्य सिंहासन गाभार्यात सप्तरंगाची मुक्त हस्ते उधळण करीत एकमेकांना रंग लावला. देवीचे महंत बजाजी बुवा, हमरोजी बुवा,आजच्या देवीच्या पूजेच्या पाळीचे भोपे पुजारी आदींनी मातेच्या मुखास हा सप्तरंग लावून मातेच्या अंगावरील भरजरी पांढर्या वस्ञावरही रंग शिंपडला. त्यानंतर देवीचा अंगारा काढण्यात आला. सकाळी बच्चेकंपनी एकमेकांना कोरडा रंग लावून तसेच पाण्यात रंग कालवून रंगाची मुक्त हस्ते उधळण केली. देविदर्शनार्थ आलेल्या भक्तांनीही एकमेकांना कोरडा रंग लावून रंगपंचमीचा सण देवीच्या दरबारी साजरा केला. दर्शनासाठी दूरदूरच्या भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरासह, शहरात सर्वदूर रंगपंचमीची धूम सुरू होती. आज रंगपंचमी दिनी सप्तरंगात न्हाऊन निघालेल्या श्री तुळजा भवानी मातेचे रूप आणखीनच खुलून दिसत होते. हा नजारा हजारों भक्तांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहून हृदयात साठवून ठेवला.मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक खासगी वाहनांतून याठिकाणी हजेरी लावत आहेत. सामान्य भाविक मूर्तीला पंचामृत अभिषेकासह इतर कुलधर्म, कुलाचार उरकून लगेच परतीच्या प्रवासाला निघत आहेत.
मंदिर संस्थानच्या वेबसाईटवर ऑनलाईन देवी दर्शनाचाही असंख्य भक्तांकडून लाभ घेतला जात आहे. सध्या मंदिराच्या राजमाता जिजाऊ प्रवेशद्वारा शेजारील जुन्या इमारतीचे पाडकाम सुरु असल्याने मुख्य महाद्वारातून मंदिरात येण्या-जाण्याचा मार्ग सुरू आहे.