सोलापूर : बाहेरची डेव्हलपमेंट बाहेरील सुख देऊ शकते; परंतु अंतर्गत डेव्हलपमेंट ही मनशांती देऊ शकते, असे विचार श्रीलंका येथील भंते यश थेरो यांनी व्यक्त केले. येथील राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ते धम्मदेशना देत असताना बोलत होते.
एकदिवसीय बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी सकाळी करण्यात आले. यावेळी श्रीलंका येथील भंते यश थेरो यांची धम्मदेसना झाली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी, कुर्डूवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल, मुंबईचे विचारवंत डॉ. आनंद देवडेकर, प्रा. डॉ. विजय मोहिते, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, कोषाध्यक्ष किरण बनसोडे, समन्वयक डॉ. सुरेश कोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भंते यश थेरो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले, ज्ञानाद्वारे त्यांनी दीन-दुबळ्यांचा उद्धार केला. धर्माशिवाय जीवन अर्थहीन आहे. दुःख निवारणासाठी धर्माला महत्त्व द्या. धर्म-अधर्म समजणे आवश्यक आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी संमेलनाची रूपरेषा सांगून आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भोसले आणि निर्मला मौळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी मानले.
बौद्ध साहित्य संमेलनासाठी श्रीलंकेहून आलेल्या भंते यश थेरो यांना परिसरात आल्यानंतर शाक्य संस्था, सिदनाक ब्रिगेड व समता सैनिक दल या तिन्ही दलांची एकसंध सलामी देण्यात आली. यावेळी जय भीमचा एकच घोष झाला. पुष्पवृष्टी करण्यात आली.
काही लोकांना बौद्ध साहित्य म्हणजे भगवान बुद्धांचे चरित्र एवढेच सीमित विषय वाटते; परंतु बुद्ध धम्म आणि त्यांची तत्त्वे सिद्धांत, आचरण, शिकवण असे कितीतरी विशाल सखोल ज्ञान आहे. बौद्ध साहित्य हे जीवनाचे दर्शन घडवणारे साहित्य आहे.योगीराज वाघमारे, संमेलनाचे अध्यक्ष