Mobile Pudhari
सोलापूर

Bhalewadi news: सायरन वाजताच गाव होतं ‌‘ऑफलाईन‌’

भालेवाडीचा ‌‘डिजिटल उपवास‌’; सायंकाळी 7 नंतर मोबाईल डेटा, टीव्ही होतो बंद, अभ्यासाचा नवा पॅटर्न

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : दिवसभर कामाच्या गडबडीत असलेले गाव आणि मोबाईलमध्ये दंग असलेली तरुण पिढी... पण संध्याकाळचे सात वाजले की, भालेवाडीचं चित्र एका क्षणात बदलतं. सायरन वाजतो आणि अवघ्या काही सेकंदात संपूर्ण गाव ‌‘डिजिटल डिटॉक्स‌’ मोडवर जातं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी गावाने सुरू केलेला ‌‘अभ्यासाचे दोन तास‌’ हा उपक्रम सध्या संपूर्ण राज्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

आजच्या धावपळीच्या युगात मुले मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेल्याने पालकांसमोर त्यांच्या अभ्यासाची मोठी चिंता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून भालेवाडी ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला.

दररोज संध्याकाळी 7 वाजता गावातील मुख्य सायरन वाजविला जातो. हा सायरन होताच गावकऱ्यांनी पाळायचे नियम ठरलेले आहेत. घरातील टीव्ही संच पूर्णपणे बंद करणे. मोबाईल डेटा बंद करून फोन बाजूला ठेवणे. विद्यार्थ्यांनी दोन तास केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नियम केवळ मुलांसाठी नाही.

सरपंच डॉ. श्रीकांत दवले यांच्या मते, जोपर्यंत पालक स्वतः मोबाईल बाजूला ठेवत नाहीत, तोपर्यंत मुले अभ्यासाला बसणार नाहीत. त्यामुळे सायरन वाजल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पालकही मोबाईलचा वापर टाळतात. हे दोन तास गावातील सामाजिक संवाद वाढवण्यासाठी आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी वापरले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT