पंढरपूर येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेतील घरे. Pudhari File Photo
सोलापूर

‘प्रधानमंत्री आवास’ योजनेतील घरकुलांची लाभार्थ्यांना प्रतीक्षाच

PM Awas Yojana | लाभार्थी स्वहिश्याची रक्कम भरेनात, शासन साहाय्य करेना

Suraj Kambale

पंढरपूर : पंढरपूर शहरात ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत शहरातील सर्व्हे नं. 17/ब याठिकाणी (एपीएच) या घटका अंतर्गत 2092 घरकुले बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम पुरेशा निधीअभावी बंद पडलेले आहे. ठेकेदार काम करायला तयार नाही. लाभार्थी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र आश्वासनानंतर काहीच मिळाले नाही. दिवाळीत घरे मिळण्याची आशा लाभार्थ्यांना होती. मात्र मिळाली नसल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर नगरपालिकेकडून सांगण्यात येते की, ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत या प्रकल्पातील मंजूर लाभार्थ्यांनी त्यांचे स्वहिश्याची देय असलेली रक्कम भरलेली नाही. त्यामुळे ठेकेदाराने काम थांबवले आहे. काम सुरू होण्यासाठी लाभार्थ्यांनी पैसे भरणे आवश्यक आहे. ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत प्रकल्पातील मंजूर लाभार्थ्यांना त्यांचे स्वहिश्याची देय असलेली रक्कम भरावी म्हणून यापूर्वीच सांगण्यात आलेले आहे. परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी अद्यापही स्वहिश्याची रक्कम भरलेली नाही. लाभार्थ्यांकडून स्वहिश्याची रकम न भरल्यामुळे रोकड प्रवाह नियमित न राहिल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.

‘प्रधानमंत्री आवास’ योजनेच्या जागेवर झालेल्या घरकुल कामापोटी 25.16 कोटी बिलाची मागणी केलेली आहे. केलेल्या कामाची बिले शासनाकडून प्राप्त 11.26 कोटी निधीतून अदा करण्यात आलेले आहेत. उर्वरित कामाचे बिल न मिळाल्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेचे काम ठेकेदाराने बंद केले आहे. उलट बिलाची रक्कम मिळावी म्हणून पंढरपूर नगरपरिषदेलाच ठेकेदाराने कायदेशीर नोटीस दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या स्वहिश्याची रक्कम 13 कोटी रुपये भरणे आवश्यक आहे तरच काम पुढे सुरु होऊ शकते. नाही तर हा प्रकल्प बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योजना कार्यान्वित व्हावी, लाभार्थ्यांना त्यांची हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT