सोलापूर

मोठी बातमी: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले तळघर; तज्ज्ञ करणार पाहणी

निलेश पोतदार

पंढरपूर : सुरेश गायकवाड दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या 2 जून पासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत.

फ्लोरिंंगचे काम सुरु असताना सापडले तळघर

दरम्‍यान विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु असतानाच एक दगड खचला. तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फुट खोल तळघर असल्याचे दिसून आले. या तळघरात मुर्ती सदृष्यवास्तू असल्याचे दिसून आले आहे. या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे. याबाबत अधिक माहिती मंदिर समिती पुरातत्व विभाग, महाराज मंडळी, जानकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

तळघरात मुर्तीसदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. याकरीता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे. तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु होते. दगडी फरशीचे फ्लोरिंग करीत असताना एक दगड खाली दबला गेला. तेथे पोकळी निर्माण झाली. तेव्हा तो दगड बाजुला काढून घेण्यात आला. तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली. फ्लोरिंग करणार्‍यां कर्मचार्‍यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता येथे तळघर असल्याचे दिसून आले आहे. या तळघरात मुर्तीसदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र, एकच दगड काढून पाहणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे. याबाबत नेमके सांगता येत नाही. तसेच या सहा बाय सहा च्या तळघरात कशाची मुर्ती आहे. हे समजू शकलेले नाही.

आज सायंकाळी तज्ज्ञ करणार पाहणी

आज (शुक्रवार) सायंकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, वास्तुविशारद तेजस्वीनी आफळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराज मंडळी, तज्ञ यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात येणार आहे.

जनाबाईच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग…

असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की, मुस्‍लीम आक्रमणापासून बचाव करण्यातसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती. मुर्ती ठेवण्यासाठीचेच हे तळघर आहे का ? याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच विठ्ठल मंदिरातून गोपाळपूर येथील जनाबाईच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. श्री विठ्ठलास जनाबाईच्या भेटीला जाता यावे म्हणून भुयारी मार्ग असल्याचेही चर्चिले जात आहे.

मंदिरातील या तळघरात नेमके काय आहे? हे तळघर आहे की भुयारी मार्ग आहे. याबाबत मंदिर समिती पुरातत्व विभाग, महाराज मंडळी तसेच तज्ञांच्या उपस्थित पाहणी करणार आहे. यानंतरच नेमकी माहिती समोर येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु आहे. सोळखांबी येथील हनुमान दरवाजा येथे दगडी फरशीचे फ्लोरिंग करीत असताना भुयारी किंवा तळघर आढळून आले आहे. यात मुर्ती सदृष्य वस्तू दिसून येतात. मात्र नेमके काय आहे, हे पाहणी केल्यानंतरच समोर येईल.
– विलास वाहने
सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT