बार्शी : आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याने धडक मोहीम राबवली. बार्शी बायपास रोडवरील कुर्डूवाडी चौक येथे रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली.
वारीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या, प्रखर एलईडी लाईट आणि कर्णकर्कश हॉर्न बसवलेल्या वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. नाकाबंदीदरम्यान ट्रॅव्हल्ससह खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. वाहनचालकांना थांबवून वेग मर्यादित ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले गेले. वाहतूक नियम आणि कायद्याची माहिती देऊन सूचना देण्यात आल्या.
तपासणीत अनेक ट्रॅव्हल्सना नियमबाह्य प्रखर एलईडी लाईट आणि कर्णकर्कश हॉर्न बसवलेले आढळून आले. असे आढळलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण २५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून १९,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आषाढी वारीच्या काळात अशी कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही संपूर्ण कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, सहा. पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पोना जगताप, पोकॉ रमेश माने, पोहेकॉ धनराज केकाण, पोकॉ उत्तरेश्वर जाधव, पोकॉ शिवशंकर खराडे तसेच होमगार्ड साठे, रगडे, काळे, पोकळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. वारकरी आणि भाविकांना सुखरूप वारी करता यावी, यासाठी बार्शी पोलिस कटिबद्ध असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.