बार्शी; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालुन खून करून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि 2) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जामगाव (आ) येथे हे प्रकरण उघडकीस आले. शुक्रवारी (दि 1) मध्यरात्री ही घटना घडली. दिड वर्षांची मुलगी रडत असल्याने व घरातून वास सुटल्यानंतर हे प्रकरण समोर आले. मयत महिलेचे नाव गंगा असे आहे.
गंगा धनाजी गायकवाड (वय 35) आणि धनाजी गायकवाड (वय 45) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धनाजी गायकवाड हा पहिल्या पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात पंधरा वर्षाची शिक्षा भोगून चार वर्षांपूर्वी जामगाव येथे राहण्यास आला होता. गंगा हिच्याशी त्याने दुसरा विवाह केला होता. त्यांना दिड वर्षाची मुलगी होती. चायनीज फुडचा व्यवसाय करुन तो कुटुंबाची उपजिवीका चालवत होता. शुक्रवारी (दि. २) रात्री धनाजी याने दिड वर्षाच्या मुली समक्ष पत्नीच्या डोक्यात वरंवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वत: चे जीवन संपवले. शनिवारी उशिरा घरातून मुलीचा रडतानाचा आवाज येऊ लागल्यानंतर पोलिसात याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी पत्रा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी मृतदेहांच्या जवळच रक्ताने माखलेला चाकु पडलेला होता. तसेच रक्ताने माखलेली रडत असलेली दिड वर्षाची मुलगी देखील आढळून आली.
तालुका पोलीस ठाण्याचे पोनी आण्णासाहेब मांजरे,जनार्दन सिरसट,राजेंद्र मंगरूळे,आप्पा लोहार,महेश डोंगरे,धनाजी केकान,अभय उंदरे,धनाजी फत्तेपुरे,सरपंच बाळासाहेब जगताप,बालाजी कागदे हे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.