बार्शी : तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे बेकायदेशीर गर्भपात केल्याने 28 वर्षीय विवाहितेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ग्रामीण भागात सुरू असलेल्या एका हायटेक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. माढा तालुक्यातून बार्शीत येऊन कारमधून चालवले जाणारे फिरते गर्भलिंग निदान केंद्र तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईने उजेडात आले आहे. या कारवाईत एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. त्यास मंगळवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अजित सुरेश मस्तुद (वय 36, रा. रोपळे, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या कारमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची 51 रिकामी पाकिटे व इतर 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धक्कादायक पुराव्यामुळे बार्शी तालुका पुन्हा एकदा अवैध गर्भपाताचे हब बनत आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जामगाव (आ) शिवारात वाणेवाडी रस्त्यावरील एका पडीक शेतात एक संशयास्पद कार उभी असून तिथे बेकायदेशीर गैरकृत्य सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथक तेथे गेले असता एमएच 45 एझेड 2166 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी असलेली दिसली. पोलिसांनी या कारवर छापा टाकला असता, आतमध्ये अजित मस्तुद हा इसम आढळून आला. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नव्हती.
याप्रकरणी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून अजित मस्तुद याच्यावर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी वाळसने, तसेच पोलिस हवालदार रेवनाथ भोंग, सुभाष सुरवसे, पोलिस नाईक मंगेश बोधले, शैलेश शिंदे, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे आणि राहुल बोंदर यांच्या पथकाने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.