बार्शी : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बार्शी शहरातील दोन नामांकित अन्न पेढ्यांवर छापा टाकून सुमारे 1 लाख 58 हजार 524 किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर राजशेखर स्वामी, सहकारी अधिकारी उमेश भुसे व सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या पथकाने मे. ए.एच ट्रेडर्स (मालक रिझवान रहिमान तांबोळी) व मे. गजानन ट्रेडर्स (मालक किरण शंकर कल्याणी) या पेढ्यांवर धाड टाकली.
ए.एच ट्रेडर्स येथे के.के. 1000 गुटखा, विमल पानमसाला, गोवा 1000 गुटखा, चंदन व राजु सुपारी, पानबहार, आरएमडी पानमसाला आदींचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत 1 लाख 35 हजार 660 रुपये आहे. तर गजानन ट्रेडर्स येथून फिलिंक्स, दिल्लगी, चंदन सुपारी तसेच बाबाप्लस, एम ब्रँड सुगंधित तंबाखू अशा प्रकारांचा 22 हजार रुपयांचा साठा सापडला.या दोन्ही ठिकाणांवरून मिळालेल्या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. ए.एच ट्रेडर्स हे दुकान सील करण्यात आले. असून गजानन ट्रेडर्स हे दुकान घरास लागून असल्यामुळे केवळ साठा जप्त करण्यात आला.
तपासणी दरम्यान दोन्ही व्यापार्यांकडे खरेदीची कोणतीही अधिकृत बिले उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यांनी बार्शी येथील तांबोळी, शेख, मिलन व राम डोंबे यांच्याकडून हा माल घेतल्याची माहिती दिली. सदर प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी रिझवान तांबोळी, किरण कल्याणी तसेच त्यांच्या पुरवठादारांविरुद्ध फिर्याद बार्शी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.