बार्शी : बार्शी येथील एका मिठाई दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांनी मिळून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने दूध व्यावसायिकासह त्याच्या मित्रांची तब्बल 1 कोटी 70 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पांडुरंग कल्याण शिंदे (वय 35, रा. बाभुळगाव) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धीरज दीपक अग्रवाल (बार्शी), रचना अग्रवाल (बार्शी), तन्मय गुप्ता (हैदराबाद), नम्रता गुप्ता आणि रचित गुप्ता (पुणे), ज्योती शिंदे आणि सुधीर शिंदे (बार्शी) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी पांडुरंग शिंदे हे दूध संकलित करून बार्शी शहरात विक्री करतात. त्यांच्या या व्यवसायातून धीरज अग्रवाल यांच्याशी ओळख झाली, जो बी.ओ. अग्रवाल नावाच्या मिठाई दुकानाचा मालक आहे. 2016 पासून मैत्रीचे रूपांतर झाले आणि धीरजने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. मे 2020 मध्ये धीरजचे दाजी सुधीर शिंदे यांच्या घरी झालेल्या बैठकीत प्रोजेक्टरवर सादरीकरण करून दरमहा किमान 5 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. ते सेबी - मान्यताप्राप्त कंपन्यांद्वारे गुंतवणूक करत असल्याचे सांगून गुडविल एस.एस.सी. ग्लोबल सेक्युरिटीज, गिल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि चॉईस ब्रोकिंग हाऊस यांची कागदपत्रे दाखवली.
यावर विश्वास ठेवून पांडुरंग आणि त्यांचे मित्र सुरेश उमाप (कळंबवाडी), अमोल जाधव (बोरगाव), विजया पवार (शेंडगे प्लॉट), शशिकांत पवार (गावडी दारफळ), राहुल जाधव (कॅन्सर चौक) आणि अख्तर तांबोळी यांनी 2020 ते 2023 दरम्यान रोख आणि ऑनलाइन पद्धतीने पैसे दिले. काही महिनेच परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर काहीच मिळाले नाही.
काही महिनेच परतावा
सुरुवातीला काही महिने 5 टक्के परतावा दिला गेला, मात्र नंतर तो थांबला. पैसे परत मागितले असता टाळाटाळ केली गेली. आरोपींनी संगनमताने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.