गणेश गोडसे
बार्शी; दिल्ली येथे सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चित्ररथ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यात बार्शी येथील सचिन व सोहम राऊत या पिता पुत्रांचा संगीत समारोहात सहभाग असणार आहे. ते गत दहा दिवसापासून दिल्लीत सराव करत आहेत.
राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर 26 जानेवारी रोजी चित्ररथ व सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात देशभरातील पारंपरिक लोकवाद्यांचा निनादही घुमणार आहे. यात वादक शहनाई, संबळ यांसारख्या पारंपरिक वाद्यांची सुरावटी सादर करणार आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक समुहामध्ये बार्शीचे सचिन राऊत, सोहम राऊत या पिता पुत्रांचा सहभाग राहणार आहे, ही बाब बार्शीकर जनतेसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
बार्शी येथे इयत्ता सातवीत शिकणारा सोहम हा देशाच्या सर्वात मोठ्या मंचावर वडिलांसोबत शहनाई व संबळसारख्या पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण करणार आहे. त्याच्याकडून पुढील पिढीला निश्चित प्रेरणा मिळणार आहे. कर्तव्यपथावर गाजणारा सोहम हा केवळ एक विद्यार्थी नसून, तो उद्याच्या सांस्कृतिक भारताचा एक उज्ज्वल चेहरा आहे.
परंपरेवरील निष्ठा
सातवीत शिकणारा सोहम राऊत महाराष्ट्राचे, बार्शीचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करण्यासाठी सज्ज झाला आहे. बालवयातच इतका मोठा सन्मान मिळणे हे अथक मेहनत, परंपरेवरील निष्ठा आणि जिद्दीचा अभूतपूर्व संगम दिसून येत आहे.