बार्शी : पुढारी वृत्तसेवा
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगाराचे भाग्य उजळले असून नूतन आगार व स्थानकाची इमारत, कर्मचार्यांसाठी सदनिका, आदी विविध कामांसाठी तब्बल 15 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. बार्शी बस स्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठीची मागणी अनेक दिवसापासून प्रवासी वर्गातून केली जात होती. जनतेच्या मागणीचा विचार करून आमदार राजेंद्र राऊत यांनी याबाबत संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या मागणीनुसार व सततच्या पाठपुराव्याने ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर झालेल्या निधीमधून बसस्थानकातील फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, रिझर्वेशन, पार्सल ऑफिस, चालक व वाहक यांच्यासाठी विश्रांती गृह ,महिलांसाठी विश्रांती गृह, हिरकणी कक्ष, प्रसाधन गृह आदी बाबी पूर्ण केल्या जाणार आहेत. या आगारामध्ये व्यापारी गाळे, कार्यशाळा, अधीक्षक कक्ष ,बॅटरी रूम, अंतर्गत काँक्रिटीकरण, कुंपणाची भिंत इत्यादी विकासात्मक कामासाठी हा 15 कोटी रुपयांचा निधी देण्यास शासनाच्या वतीने अंदाजपत्रकात प्रशासकीय विधी मान्यता देण्यात आली आहे.
बार्शी बस स्थानक नूतनीकरणाचा खर्च गृह विभागाच्या उपलब्ध असलेल्या निधीमधून करण्यात येणार आहे. बस स्थानकामध्ये तळमजला व इतर दोन मजले केले जाणार आहेत. आगारामधील व इतर कर्मचार्यांसाठी दोन मजली सदनिका उभारली जाणार आहे. तसेच बार्शी नगरपालिकेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत नऊ कोटी 55 लाख रुपये, दलितेत्तर वस्ती सुधारणा अंतर्गत दोन कोटी दोन लाख रुपये , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सहा कोटी 56 लाख रुपये, तसेच बार्शी येथे सीबीएससी इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी तीन कोटी 74 लाख रुपये, सभागृह व शौचालयासाठी आमदार निधी मधून एक कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर झाल्याचेही आमदार राऊत यांनी सांगितले.
वैराग शहरासाठी ही सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत दोन कोटी, दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत 50 लाख रुपये व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत एक कोटी सात लाख रुपये असा 3 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.