Barshi Water Project 
सोलापूर

Barshi Water Project: बार्शीला ५ टीएमसी पाण्याची शिफारस

१७ हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी; डॉ. धुमाळ यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यात वळविणाऱ्या तब्बल १७ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, या योजनेतून सोलापूर जिल्ह्यासह दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीवाटपात कमी वाटा मिळालेल्या बार्शी तालुक्यासाठी या योजनेतून ५ टीएमसी पाण्याची शिफारस करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी दिली.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सभापती विजय गरड आदी उपस्थित होते.डॉ. धुमाळ म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गत हे पाणी आणले जाणार आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्याला ४० ते ५० टीएमसी तर मराठवाड्याला सुमारे १५ टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बार्शी तालुका पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे या योजनेत बार्शीसाठी स्वतंत्र ५ टीएमसी पाण्याची तरतूद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे. या पाण्यामुळे बार्शी तालुक्याचा पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. दरम्यान, गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून या योजनेलाही आता गती मिळाली आहे.

तावडी तलावात पाणी सोडण्यासाठी निधीअभावी आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे रखडलेले काम आता मार्गी लागले आहे. निधीची अडचण दूर झाली असून पुढील आठवड्यात संबंधित ठेकेदारांना निधी वितरित करून काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.योजनेच्या टप्पा-३ अंतर्गत पिंपळगाव ढाळे धरणात पाणी सोडण्याच्या कामात काही तांत्रिक अडथळे होते, ते दूर करण्यासाठी लवकरच मंत्रिस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही डॉ. धुमाळ यांनी सांगितले.

बार्शीच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्‍मकता

यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहराच्या पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले जात असताना लक्ष्याचीवाडी येथील टप्पा-२ मधून बार्शी नगरपालिकेला पुढील दोन वर्षांसाठी दररोज ९० लाख लिटर पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन डॉ. धुमाळ यांनी दिले. तत्पूर्वी डॉ. धुमाळ यांनी बार्शी उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT