बार्शी : बार्शी बसस्थानकावर वारंवार होणार्या चोर्या लूट थांबवण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून चोरट्यांनी शनिवारी 5 तोळ्यांचे दागिने असलेली बॅग लंपास केली.दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे 3 लाख 56 हजार 200 रुपये इतकी आहे.
श्रद्धा रवींद्र सरक (वय 20) यांचा दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी विवाह झाला. त्या गावाकडे आपल्या बहिणीच्या लग्न कार्यासाठी निघाल्या होत्या. विवाहप्रसंगी मिळालेल्या आणि गावाकडे वापरासाठी नेलेले मौल्यवान सोन्याचे दागिने त्यांनी आपल्या बॅगेत ठेवले होते. पुण्याहून प्रवास करून दुपारी 3 वाजता ते बार्शी बसस्थानकात पोहोचल्या. त्यानंतर धाराशीवसाठी दुसर्या बसची वाट पाहताना, दुपारी 3:20 वाजता बस लागताच त्या रेगझीनच्या बॅगेसह बसमध्ये चढल्या व बॅग सीटच्या वरच्या रॅकमध्ये ठेवली.
बसमध्ये गर्दी असताना आपल्या वयोवृद्ध आजी आजोबांना सीटवर बसवण्यासाठी त्या खाली उतरल्या असता काही क्षणातच बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. श्रद्धा यांनी बार्शी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली.या घटनेनंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. बसस्थानकात गर्दीच्या वेळी सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नाही.