मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र बाबासाहेब अंकुश पांढरे हे डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले.
बाबासाहेब अंकुश पांढरे हे आठ वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. मिसामारी (आसाम) येथे 671 इ एम इ बटालियनमध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून ते कार्यरत होते. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दुचाकीवर आपले कर्तव्य बजावत असताना अचानक वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी बाबासाहेबांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. जवान पांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बुधवारी रात्री कात्राळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.