सोलापूर : गरीब व सर्वसामान्य नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात अद्यापही अडथळेच आहेत. पात्र, असलेल्या ४० लाखांहून अधिक नागरिकांपैकी केवळ १६ लाख८७ हजार जणांचेच आयुष्मान कार्ड तयार झाले आहेत. सुमारे २४ लाख लाभार्थी या सुविधेपासून अद्याप दूरच आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत अवघ्या २९ हजार ४४३ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला. यावरून अंमलबजावणीचा वेगही संथ असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत आहे. मात्र, आधार व रेशनकार्ड लिंक नसणे, लाभार्थ्यांच्या नावातील विसंगती, ऑनलाइन प्रक्रियेमधील अडथळे तसेच ग्रामीण भागातील इंटरनेटच्या समस्यांमुळे अनेकांना कार्ड मिळण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना ऐनवेळी उपचारासाठी धावपळ करावी लागत असल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे.
अजुनही आव्हान आहेच
जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेसाठी ४० लाख ९१ हजार ९९६ नागरिक पात्र आहेत. यात आतापर्यंत १६ लाख ८७ हजार १५० आयुष्मान कार्डे तयार झाली असून जिल्ह्याची प्रगती ही ४१ टक्क्यांवर आहे. उर्वरित २४ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत ही योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
ग्रामीण भागात सर्व्हर डाऊनच
ग्रामीण भागात सर्व्हरची वारंवार अडचण येते व आरोग्य मित्रांची अपुरी संख्या व त्यांची उपलब्धता यामुळे लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील १२३ रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा आहे. कागदपत्रांतील त्रुटी दूर करण्यासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारांपूर्वीच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात आयुष्मान कार्ड निर्मितीचा वेग वाढविली जात आहे. यासाठी विविध स्तरांवर मोहीम सुरू आहे. आधार-रेशन लिंकिंग व कागदपत्रांतील त्रुटी दूर झाल्यानंतर अधिकाधिक पात्र नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल.डॉ. प्रवीण गुंजाळ, जिल्हा समन्वयक, आयुष्मान योजना