सोलापूर : ध्येयाने झपाटलेली माणसे आपल्यातील करिअरला न्याय देऊन जीवनात खूप पुढे जातात आणि कमालीचे यशस्वी होतात. अविनाश इनामदार आणि विजय साळुंखे या दोन व्यक्ती त्याचेच जिवंत उदाहरण आहेत, असे गौरवोद्वार प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांनी काढले.
शनिवारी, हुतात्मा स्मृती मंदिरात शिवरंजनीच्या वतीने अवधूत गुप्ते यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजितकुमार कडकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथील संगीतकार अविनाश इनामदार यांना शिवरंजनी कलागौरव, तर सोलापुरातील नाट्य व्यवस्थापक विजय साळुंखे यांना शिवरंजीन संगीत सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आ. विश्वनाथ चाकोते, दत्ता सुरवसे, धीरज जवळकर, महेश बडुरे, पद्माकर कुलकर्णी, उन्मेष शहाणे, उमेश शहाणे यांच्यासह आदी उपस्थित होते.
मैफिलीला रसिकांची दाद
शिवरंजनीने कलागौरव पुरस्काराच्या निमित्ताने संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांवर आधारित पंचम स्वर हा कार्यक्रम सादर केला. यात बर्मन यांची गाजलेली एकापेक्षा एक सरस अशी गाणी सुहास सदाफुले, वीणा भाद्रायणी, विश्वास शाईवाले, उन्मेष शहाणे, स्वरदा व आरोही मोहोळकर या कलावंतांनी सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना उमेश मोहोळकर आणि विश्वास शाईवाले यांची होती. दिग्दर्शन उन्मेष शहाणे यांचे तर संगीत संयोजन समीर जैन (रणदिवे) यांचे होते. निवेदन माधव देशपांडे यांनी केले.