Dussehra 2024 : श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट File Photo
सोलापूर

Dussehra 2024 : श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या (दसरा) निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दसरा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला.

दसरा अर्थात विजया दशमी. या निमित्त लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यासाठी सुमारे 1 टन झेंडू व आपट्याच्या पानांचा वापर करण्यात आला. पुणे येथील दानशुर भाविक राम जांभूळकर यांनी सेवाभावी तत्वावर मोफत सजावट केली आहे. केशरी रंगाच्या या झेंडू फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. 

सकाळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते ध्वजपूजन होऊन नवीन ध्वज लावण्यात आला. संत नामदेव पायरी येथून सायंकाळी सवाद्य रथ मिरवणूक निघाली. रिध्दीसिध्दी गणपती मंदिराजवळ सिमोल्लंघन करून प्रदक्षिणा मार्गावरून संत नामदेव पायरी जवळ आली. त्यानंतर नगर प्रदक्षिणा मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच सणानिमित्त संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामधील भोजन प्रसादाचा गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. त्याचा सुमारे 1500 भाविकांनी लाभ घेतला. तसेच दर्शनरांगेत पिण्याचे पाणी व चहा वाटप व्यवस्था करण्यात आली.

भाविकांना विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात व परिवार देवता मंदिरात आवश्यक व पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT