सोलापूर : सोलापुरात बनावट संस्था सुरू करून त्याद्वारे १० कोटी रुपयांची रक्कम जमा करणाऱ्या तिघांवर राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) गुन्हा दाखल केला त्यातील एकास अटक केली. पाकिस्तानी नागरिकांशी त्यांचे संबंध आढळल्या नंतर ही कारवाई करण्यात आली. या संस्थेला मदत करणाऱ्या राज्यातल्या दुसऱ्या आंतराष्ट्रीय संस्थेने देखील तब्बल १२६ कोटी रुपयांची रक्कम जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोलापुरातील तिघांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीतील त्रुटींचा गैरफायदा घेत बनावट स्थंस्था सुरू केली. या संस्थेच्या नावे पॅनकार्डही काढले. प्रथम या संस्थेला आंतराष्ट्रीय संस्थेकडून आठ लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यानंतर या संस्थेने सोलापुरात आवाहन करुन १० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम जमा केली. याची माहिती मिळताच एटीएसने त्यातील एकास ताब्यात घेतले.
त्याचा मोबाईल तपासला असता पाकिस्तानातील ५० नागरिकांशी त्याचा संपर्क असल्याचे उघडकीस आले. त्याला मदत केलेल्या आंतराष्ट्रीय संस्थेने अशाच पध्दतीने १२६ कोटी रुपये जमा केले असून त्यांचा देखील ७० पाकिस्तानी नागरीकांशी संवाद सुरु होता चार व्हॉट्सॲप ग्रुपव्दारे ते कामकाज चालवत होते. ही माहिती समजताच एटीएसने सोलापुरातील आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला.
सोमवारी (दि. १३) त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी त्यांच्या जामीनास तीव्र विरोध केला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि दहशतवाद विरोधी पथकाने सादर केलेले गंभीर पुरावे ग्राह्य धरत, जिल्हा व सत्र तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
सोलापुरातील तिघांनी बनावट संस्था उघडून दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली. त्यांना प्रथम आठ लाख रुपयांची फंडिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने १२६ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचे पाकिस्तानातील नागरीकांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम देशविघातक कृत्यांसाठी वापरलेली असावी किंवा त्याचा वापर करण्यात येणार असावा असा संशय आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला. तो न्यायालयाने मान्य करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.- ॲड. प्रदीपसिंह रजपूत, जिल्हा सरकारी वकील