पोखरापूर : मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध वर्षीय महिलेची फसवणूक करून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्या खात्यातील मोहोळ शहरातील दोन एटीएम मधून 1 लाख 52 हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढल्याची घटना घडली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ शहरातील गायकवाड वस्ती परिसरातील कालिंदी लक्ष्मण गायकवाड (वय 63 ) ही वयोवृद्ध महिला दि. 13 जून रोजी मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर येथे आपल्या खात्यातून एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएम च्या बाहेर एक अज्ञात इसम उभा होता. कालिंदी गायकवाड या एटीएम मध्ये गेल्यानंतर तोही त्यांच्या मागे गेला. त्यावेळी गायकवाड यांनी त्याला विश्वासाने एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड दिले. खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम चा पिन नंबर दिला. त्याने हातचलाखी करत गायकवाड यांचे एटीएम बदलले व त्यांच्या समोर एटीएममधून पैसे निघत नसल्याचे दाखवले. अज्ञात चोरटा त्या ठिकाणाहून गायकवाड यांचे ए.टी.एम. घेऊन पळून गेला.
त्यानंतर गायकवाड यांनी सोलापूर रस्त्यावरील दुसर्या एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम कार्ड बदलल्यामुळे त्या ठिकाणाहून पैसे निघाले नाहीत. या फसवणुक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस नाईक- ढवळे करीत आहेत.