लक्ष्मी टाकळी येथे दोन गटात जोरदार राडा  Pudhari Photo
सोलापूर

सोलापूर : लक्ष्मी टाकळी येथे दोन गटात जोरदार राडा

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर शहरानजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी येथे रविवारी (दि.१८) सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन राजकीय गटांमध्ये तलवार, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने जोरदार हाणामारी झाल्याने नऊजण जखमी झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल केलेल्या फिर्यादींनुसार एकूण २४ जणांविरूद्ध गुन्हे नोंद झाले आहेत. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून तालुका पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्ग पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे या दोन गटात गेल्या कांही दिवसांपासून वादविवाद तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादाचे रविवारी सायंकाळी हाणामारीत रूपांतर होऊन दोन्ही बाजुंचे ९ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांचे पथक दाखल झाले. रात्रभर आणि सोमवारीही या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, मांडवे गटाकडून विवेक ऊर्फ पिंटू औदुंबर मांडवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संजय साठे, महेश साठे, दयानंद साठे, औदुंबर ढोणे, बापू उकरंडे, राजू उकरंडे, सोमनाथ कोळी, गोट्या नागटिळक आदी ११ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मांडवे हे आनंदनगर चौकात मनोज घाडगे यांच्या चहाच्या दुकानात वाढदिवस साजरा करण्यासाठी थांबले असताना साठे गटाच्या मंडळींनी बेकायदेशीर जमाव जमवून तलवारी, कोयता, लाकडी दांडके घेऊन मारहाण केली. यात स्वत: पिंटू मांडवे, त्यांचा भाऊ संदीप मांडवे, मनोज घाडगे व धीरज देवकते हे चारजण जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वडणे हे करीत आहेत.

साठे गटाकडून संजय साठे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप मांडवे, विवेक मांडवे, धीरज देवकते, सूरज देवकते, मनोज घाडगे, सुनिल शिंदे, नागेश जाधव (सर्व रा.लक्ष्मी टाकळी), विशाल कदम, सूरज कदम, दिनेश पांढरे, आकाश पोळ, नागेश पोळ व सोमनाथ खाडे (सर्व रा.संतपेठ, पंढरपूर) अशा १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादी साठे व त्यांचे भाऊ विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपवून घराकडे येत असताना मांडवे गटाच्या मंडळींनी तलवारे, लोखंडी पाईप, गज, काठींच्या सहाय्याने हल्ला केला. यामध्ये संजय साठे, महेश साठे, रेश्मा साठे, दयानंद साठे, आदित्य साठे, कृष्णा साठे हे ५ जण जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT