सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून लाकडी बांबूने वृध्दास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वाडिया हॉस्पिटल शेजारी भाजी मार्केट येथे घडली. याप्रकरणी प्रभू वालाप्पा शेळके (वय 69, गोटेवाडी, ता. मोहोळ) यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर चौगुले, शारदाबाई चौगुले, बिरुदेव शेळके (रा. मु. पो. गोटेवाडी) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी भाजी मार्केट येथे भाजी विकण्याकरिता बसण्याची जागा झाडून काढताना अचानकपणे मागील भांडणाचा राग मनात धरून गावातील ज्ञानेश्वर चौगुले याने हातातील लाकडी बांबूने फिर्यादीच्या कमरेवर व हातावर मारून गंभीर जखमी केले. तसेच शारदाबाई चौगुले व बिरुदेव शेळके यांनी शिवीगाळ करून त्याला सोडू नका असे म्हणून मारण्यास लावले आहे असे फिर्यादीत नमूद आहे.
बनावट दस्त करून 37 लाखांचा अपहार
बनावट दस्त तयार करून ते खरे आहे असे भासवून 36 लाख 97 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. ही घटना जुलै 2024 ते आजपर्यत कॅन्सर सेंटर रामवाडी येथे घडली. याप्रकरणी डॉक्टर प्रमोद कालिदास टिके (वय 43) यांच्या फिर्यादीवरून चंद्रशेखर म्हेत्रे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपींने फिर्यादींच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असलेला विश्वासाचा गैरफायदा घेऊन फिर्यादींच्या संस्थेची फसवणूक व विश्वासघात करण्याच्या उद्देशाने फसवणूक करत हिशोबात अफरातफर केली. संस्थेमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांनी जमा केलेले पैसे कंपनीच्या खात्यात भरले नाही. ते पैसे स्वतःच्या खात्यात भरून कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी खोटे व बनावट दस्त तयार करून ते खरे आहे असे भासवून आत्तापर्यंत लेखापरीक्षणा नुसार अंदाजे 36 लाख 97 हजार 500 रुपये रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विडी घरकुल येथे घरगुती वादातून ब्लेडने गळ्यावर मारून घेतल्याने असिफ उस्मान मुल्ला (वय 26, रा. नवीन विडी घरकुल) हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
जळकोटवाडी येथे झाडाखाली बसलेल्या वृद्धाला दुचाकीने धडक दिली. विठोबा भिमराव कदम (वय 85, रा. जळकोटवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
मोहोळ तालुक्यात अज्ञात कारणावरून पिकावर फवारणी करण्याचे विषारी द्रव प्राशन केले. यात प्रकाश जाधव (वय 34, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
गडगी नगर येथे उधारीचे पैसे देण्याच्या वादातून रोहित, अनिकेत यांनी मारहाण केली. यात विजय दत्तू लोखंडे (वय 38, रा. घरकुल) हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.