पोखरापूर : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो खो विश्वचषक २०२५ स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ९३ गुणांनी पराभव केला. यामध्ये मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील अश्विनी शिंदे हिने चमकदार कामगिरी करत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला.
मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी गावातील अश्विनी आप्पासाहेब शिंदे हिची नवी दिल्ली येथे होत असलेल्या खो-खो वर्ल्डकपसाठी अंतिम संघात निवड झाली होती. आत्तापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये अश्विनी शिंदे हिने चमकदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, अश्विनी शिंदे आणि रेश्मा राठोड यांनी आक्रमक खेळ केला. भारतीय संघाने १०९ विरुद्ध १६ असा मोठ्या फरकाने विजय मिळवला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मोठ्या गुणांनी विजय मिळवणे हे भारतासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण यापुढे अजून दोन लढती असल्याने प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यासाठी हा विजय खूप मोलाचा ठरणार आहे. या सामन्यात पहिल्या टर्ममध्ये भारताने मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या टर्ममध्ये आघाडी आणखी मजबूत केली. अश्विनी शिंदे हिने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल मोहोळ तालुक्यातील क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी घोडदौड सुरू असून उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारतीय महिला संघाची लढत होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.