पंढरपूर : गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे दाखल झालेल्या संतांच्या पालख्या व भाविक . Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Yatra | गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; पालख्यांचा परतीचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. दर्शनानंतर पालख्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.

पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4 वाजता गोपाळपूरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 450 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.

सकाळी 9 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 10 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.

तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे 2.30 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे 3.30 वाजता श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले.

गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उज्वला बनसोडे, ग्रामसेविका ज्योती पाटील व गोपाळ कृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांनी पालख्यांचे व दिड्यांचे स्वागत केले. या सोहळ्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संत-देव भेटीचा सोहळा

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. यावेळी देवाची आणि संतांची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला. यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या. तत्पूर्वी संत निवृत्तीनाथ महाराज, संत चांगावटेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत निळोबाराय, विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या संतांचा देव भेटीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पाडला.

बुधवारी प्रक्षाळपूजा

आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता अहोरात्र उभे असतात. या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात. श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो. त्यामुळे बुधवार (दि. 16) श्रींची प्रक्षाळपूजा करण्यात येणार आहे. प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल- रुक्मिणीचे 24 तास दर्शन बंद होऊन पूर्ववत दर्शन सुरू राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT