रवि शिरढोणे
अकलूज : ‘चालला गजर, जाहलो अधीर, लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला...’ लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने विठुनामाचा जयघोष करीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. 1) सकाळी 8.45 वाजता नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन जेसीबींच्या सहाय्याने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
पालखीचा दि. 30 जूनचा सराटी (जि. पुणे) येथे शेवटचा मुक्काम होता. प्रवेशापूर्वी पालखीतील तुकोबांच्या पादुकांना नीरा नदी पात्रात शाही स्नान घालण्यत आले. जिल्ह्याच्या हद्दीत खा. धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी कुलदीप जंगम, मदनसिंह मोहिते-पाटील, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप गिल, तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे व विविध खात्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी पुणे जिल्ह्यातून पालखीची सूत्रे सोलापूर जिल्ह्यातील अधिकार्यांकडे सुपूर्द केली.
सकाळी 9.50 वाजता पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीत गांधी चौकात आगमन झाले. यावेळी अकलूजकरांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वागत केले.
विठ्ठल मंदिरकडे ग्राम प्रदक्षिणेसाठी गेला. सकाळी 10.30 वाजता सदुभाऊ चौकात पालखीचे सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रिंगण सोहळ्यासाठी आगमन झाले. शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने पालखीचे स्वागत केले.
माझ्या अंगणी, सोहळा रिंगणाचा, घुमला जयघोष, इथे सावळ्याचा।
आश्वासह धावती, वैष्णवजन, भक्तीरसाने उजळली, लाखो मनं॥
यावेळी नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खा. कल्याणराव काळे, खा. भास्कर भगरे, डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील, किशोरसिंह माने-पाटील उपस्थित होते. रिंगण सोहळ्यानंतर वैष्णवांनी मैदानावर पारंपारिक खेळ सादर केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा सन्मान केला. पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर दर्शनासाठी व मुक्कामासाठी विसावला. दिवसभर अकलूजच्या चौका-चौकात भारुड, कीर्तनाने रंगत आणली. अकलूज परिसरातील विविध मंडळांनी, संस्थांनी, व्यापार्यांनी वैष्णवासाठी नाष्टा, फळे व अन्नदानाची सुविधा पुरवली. दिवसभरात लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यातील तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीने 10.30 वाजता प्रवेश केला. पालखीची मानाची आरती व पाद्यपूजा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व ऋतुजादेवी मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाली. पालखी सोहळ्याचे तिसरे व जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण सोहळ्याला सकाळी 11.08 वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीस पताकाधारी, तुळशी व हांडा धारक महिला, विणेकरी, टाळकरी यांनी धावत एक फेरी पूर्ण केली. सोहळ्यातील दोन्ही अश्वांची पूजा केली. त्यानंतर बाभुळगावकरांचा देवाचा अश्व व पाठीमागे मोहिते-पाटील यांच्या स्वारधारक अश्वाने रिंगणात धावत प्रत्येकी तीन फेर्या पूर्ण केल्या, तसा वैष्णवांनी तुकोबारायांचा एकच जयघोष केला.