श्री संत गजानन महाराज पालखीचे जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करताना अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर व ग्रामस्थ. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | शेगावीच्या राजाचे जिल्ह्यात स्वागत

टाळ-मृदंगांच्या निनादात पालखी दाखल; उळे गावी मुक्काम

पुढारी वृत्तसेवा
संतोष पवार

कासेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे आगमन झाले. टाळ-मृदंगांच्या निनादात, ‘गण गण गणात बोते’च्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पालखीचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे, ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह महसूल खात्याच्या विविध अधिकार्‍यांनी, भाविकांनी जिल्ह्याच्या सीमेवर पालखीचे भक्तिभावात स्वागत केले.

यावेळी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण खारे, उळे गावचे उपसरपंच नेताजी खंडागळे, कासेगाव सरपंच यशपाल वाडकर, युवा उद्योजक बालाजी चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कोतवालसह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कपाळी गोपीचंदनाचा टिळा, बुक्का, अष्टगंधाचा सुगंध, खांद्यावर भगव्या पताका आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सुमारे 700 वारकर्‍यांसह फुलांनी सजवलेली पालखी हरिनामाच्या गजरात दाखल झाली. यामुळे उळेसह पंचक्रोशीत उत्साह निर्माण झाला.

उळेगावातील मुक्कामात भजन, कीर्तन, हरिपाठ, अभंग गायन व धार्मिक कार्यक्रम पार पडले. वारकर्‍यांसाठी आरोग्य तपासणी, भोजन, निवास, शुद्ध पाणी तसेच आवश्यक सोई-सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या. दरम्यान, रविवारी ( दि. 30) पहाटे महाआरतीनंतर पालखी सोहळा उळेगावातून सोलापूर शहराकडे मार्गस्थ होईल.

उळे गावामध्ये श्री संत गजानन महाराज पालखीचे आणि वारकर्‍यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. बळीराजाचं राज्य यावं आणि जनतेने सुख-समाधानाने नांदावं, हीच श्री गजाननचरणी प्रार्थना! ही पालखी म्हणजे केवळ परंपरेचा वारसा नव्हे, तर श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सामाजिक ऐक्याचा अद्वितीय संगम आहे.
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT