सोलापूर : बॉम्ब आणि इतर स्फोटक वस्तू शोधणारे सोलापूर जिल्ह्यातील दोन श्वान टेरी आणि कोको आषाढी वारीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सोबतीला दहा जिल्ह्यांचे बीडीडीएस म्हणजेच बॉम्ब डिटेक्टशन अॅण्ड डिस्पोजल स्क्वॉड पथक आणि प्रत्येकी एक श्वान आषाढी वारीत तैनात ठेवण्यात आले आहे.
आषाढी वारीत सुुमारे वीस ते पंचवीस लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी दहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. यंदा ड्रोन आणि एआयची मदतही घेतली जाणार आहे. त्याच बरोबर बीडीडीएस पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यासह ठाणे, धाराशिव, सातारा, सांगली परभणी, पुणे सिटी, लातूर, हिंगोली, जालना येथील बीडीडीएस पथक वारीत तपासणी करीत आहे. एका बीडीडी पथकात एका श्वानासह एक हॅण्डलर, दोन टेक्निशिअन आणि इतर पोलीस मदतीला राहणार आहेत. या टिमला वेगवेगळ्या ठिकाणी तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.
नातेपुते, अकलूज, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर लातूर, हिंगोली आणि परभणीच्या पथकाने तपासणी केली. आता आषाढीत वीस लाखांच्यावर वारकरी तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, महत्त्वाच्या व्यक्ती पंढरपुरात येतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तीन ते सहा जुलै दरम्यान आठ जिल्ह्यांचे बीडीडीएस पथक प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी करणार आहे. सोलापूर श्वान पथकाच्या स्फोटक तपासणीमधील दोन श्वान टेरी आणि कोको हे सध्या वारीत तपासणीचे काम करीत आहेत. त्यांच्या सोबतीला इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एक स्फोटक शोधक श्वान असणार आहे.
गुन्हे शोधक पथकातील श्वान जिमीला राज्याचे गोल्ड मेडल मिळाले आहे, शिवा सौदागरे आणि एकनाथ छत्रे हे पोलीस अंमलदार त्याचे हॅण्डलर आहेत. मॅक्स या श्वानाने देखील अनेक मेडल मिळवली आहेत. पोलीस अंमलदार लक्ष्मण कोळेकर आणि तौसिफ दिंडोरे हे त्यांचे हॅण्डलर आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलात सात श्वान कार्यरत आहेत. त्यातील चार श्वान स्फोटक वस्तू तपासणीसाठी, दोन श्वान गुन्ह्यांसाठी तर एक श्वान अंमली पदार्थ शोधण्याचे काम करतो. त्यासाठी 14 पोलिसांची टीम काम करते आहे. स्फोटक वस्तू शोधणार्या चार श्वानांपैकी तीन श्वान लॅबरॉडोर, एक श्वान जर्मश शेफर्ड जातीचे आहे. गुन्हे तपासणीतील दोन श्वानांमधील एक श्वान नव्या बेल्जियन मिलेनिअस जातीचे तर एक डॉबरमॅन आहे. अमली पदार्थ तपासणीतील एक श्वान बेल्जियन मिलेनिअस जातीचे आहे.