मोडनिंब : संत एकनाथ महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आज संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात विसावला. हा पालखी सोहळा पैठणपासून २५० किमीचे अंतर पायी पार करत ,५ रिंगण सोहळे सादर करुन लवूळ येथील विठ्ठल भक्त संत कुर्मदासांच्या समाधी चे दर्शन घेऊन सोमवारी सावता महाराजांच्या भेटी अरण मध्ये सायंकाळी 6 वाजता दाखल झाली.
पैठणहून आलेल्या दिंड्या व पालख्यांनी सावतोबांचा भक्तीचा मळा फुलून गेला. सर्वत्र विठूनामाचा गजर होत होता. भानुदास एकनाथ असे म्हणत वारक-यांनी गावातील रस्त्यावर फेर धरला. गावात आल्यावर पालखीचे स्वागत अरणमधील नेतेमंडळी व ग्रामस्थांनी केले. गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, रस्त्यावर रांगोळी पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.
गेली २०० वर्षीपासून याच मार्गाने नाथ पालखी सोहळा आषाढीवारीसाठी पंढरपूरास जातो. दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा ह.भ.प. रघुनाथ महाराज गोसावी व ह.भ.प. योगेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणहून पंढरपूरास निघालेला आहे. ३५ हून अधिक पाई दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्या असून १८,००० वारकरी भक्त पायी विठ्ठल भेटीला पंढरपूरपुरास चालत निघाले आहेत.
पालखी सोहळ्यासोबत योगेश महाराज पालखीवाले ,रखमाजी महाराज नवले, नामदेव बुवा ऊगले, गंगाराम महाराज राऊत, भानुदास महाराज शेळके, गणेश बुवा डोंगरे, भानुदासबुवा पुरुषोत्तम, पांडुरंग महाराज पिंपळेकर, धनक महाराज, केदारनाथ बुवा कारकिनकर, गोरक्षमहाराज राउत, महादेव बुवा पाचीकर, वाघमारे महाराज वाडगीकर, दुर्गाताई क्रुष्णापुरकर, महालिंगमहाराज दिघोळकर, शाम महाराज नेरुळकर, चंद्रकांत खेडकर, बाळा मुरुडेश्वर, तळपे महाराज खेडकर, वाहेगावकर महाराज हे दिंड्यांचे प्रमुख पायी चालत आहेत. उद्या दुपारी हा पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान करेल.