महूद : महूद (ता. सांगोला) : जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गाचे प्रमुख मध्यवर्ती केंद्र असलेल्या महूद येथील मुख्य चौकात आषाढी वारीनिमित्त प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या अथांग रांगांमुळे गेले आठवडाभर संपूर्ण चौक ठप्प झाला आहे. ‘वारी पंढरपूरला तर गर्दी महूदला’, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पंढरपूर येथे प्रस्तावित असलेल्या 'कॉरिडॉर विकास योजने'त महूदचा समावेश करावा, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे. लाखो भाविक अन् वाहनांच्या रांगांनी महूद चौक ठप्प झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातून लाखो भाविक, असंख्य पालखी सोहळे व शेकडो दिंड्या महूद मार्गे पंढरपूरकडे जातात.
आषाढी एकादशीच्या काळात धावणाऱ्या विशेष एस.टी. बसेस, वारकऱ्यांचे टेम्पो, ट्रॅक्टर आणि जीप यांसारख्या वाहनांची मोठी भर पडते. त्यातच जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गावरून नियमित धावणारी अवजड वाहने, मोठे ट्रक, कंटेनर आणि ट्रॅव्हल्स यामुळे मुख्य चौकात अहोरात्र वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. एकादशीचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतरही परती प्रवासासाठी हजारो वाहने याच मार्गाने जात असल्याने कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे.