पंढरपूर : ‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा... अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर...’ अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा रविवारी (दि. 6) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या रात्री तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या आहेत. यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे 20 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे.
मजल-दरमजल करत देहू, आळंदीसह विविध ठिकाणांहून संतांच्या पालख्या वाखरीत विसावल्या. त्या ठिकाणी रिंगण, आरती, कीर्तन, भजन, भारुडे झाली. वाखरीत हलक्या पावसाने हजेरी लावली. याअगोदर जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला असल्याने राज्यभरातून व परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊसकाळ झाला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता एस.टी., रेल्वे, खासगी वाहनांची, तसेच पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. 5,200 जादा बसेस आषाढीकरिता सोडल्या आहेत. जादा रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत, तर खासगी वाहनांनीदेखील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. 18 ठिकाणी पार्किंग उभारण्यात आली आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर 7 कि.मी.पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत, तर 65 एकर भक्तिसागरात 4 लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तूंब, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.
यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग 7 कि.मी. अंतरावर पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागत आहे. एका मिनिटाला साधारणपणे 50 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. तर तासाला 3,000 भाविकांना दर्शन मिळत आहे. आणखी दर्शन रांग पुढे पुढे सरकत चालली आहे; तर मुखदर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत जाते. येथूनही पुढे चौफळ्यापर्यंत मुखदर्शन रांग येत आहे. मुखदर्शनासाठीदेखील किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे.
भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरांतील मठ, मंदिरे, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाली आहेत. मठ, मंदिरांतून भाविक भजन, कीर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात्रेपूर्वी चंद्रभागेत मुबलक पाणी सोडण्यात आले होते. एकादशीपूर्वी मात्र ते कमी करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या 20 स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत; तर 190 होड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 8 हजार 117 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांची करडी नजर भाविकांवर आहे. 10 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 14 प्रशिक्षित पथके, तर 7 ठिकाणी मदत व प्रतिसाद केंद्रे, 10 ठिकाणी होडी नियंत्रक पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, तीन ठिकाणी मुख्यमंत्री सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांत भाविकांसाठी राहण्यासाठी निवारा, फूट मसाज, आरोग्य केंद्राचा समावेश आहे.
पंढरपूर नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्या वतीने आरोग्यविषयक सेवा बजावण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर दर्शन रांग येथे आरोग्य, तर 65 एकर येथे महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येथेही लाखो भाविक औषधोपचाराचा लाभ घेत आहेत. 6 हजार 813 शौचालये, महिला स्नानगृह चार ठिकाणी उभारण्यात आली आहेत. चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणार्या भाविकांमध्ये विठुमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत आहे.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये शनिवारीच दाखल झाले. त्यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे.
12 शेड, 2 जर्मन हँगर भरून सात कि.मी.पर्यंत गेली दर्शन रांग
दर्शन रांगेत भाविकांसाठी अन्न, पाणी, औषधोपचार, कुलर्स, पोलिस संरक्षण, हिरकणी कक्ष, पोलिस मदत केंद्र, विश्रांत कक्ष
मिनिटाला 50 भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न
दर्शन रांगेत 4 लाखांवर भाविक दाखल
दर्शनासाठी 10 ते 12 तासांचा कालावधी
भक्तिसागर 65 एकर भाविकांनी फुलला
आठ हजार 117 पोलिसांचा बंदोबस्त
5 हजार 200 जादा एस.टी. बसेस
10 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र
चंद्रभागा नदीकिनारी जीवरक्षक तैनात