पंढरपूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा तीन दिवसांवर आला आहे. यामुळे पंढरपूर भाविकांनी गजबजू लागले आहे. मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यातच आज बुधवार, दि. २२ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करीत आहेत. तर दुपारी पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे माऊली व सोपानदेव यांचा बंधूभेट सोहळा रंगणार आहे. विठूरायाची पंढरी जवळ येऊ लागल्याने भाविक, वारकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मंगळवारी सायंकाळी वेळापूर येथे विसावलेला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. ठाकूरबुवाची समाधी मंदिर येथे माऊलींचे दि. २२ रोजी तिसरे गोल रिंगण होणार आहे. तर तोंडले-बोंडले येथील दुपारचा विसावा घेणार आहे. यानंतर पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. तर तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देखील पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. माऊली व तुकोबा यांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल होत असल्याने वैष्णवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, आषाढी यात्रेनिमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पध्दतीची दर्शनरांग तयार केली आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद व सुलभ दर्शन होत आहे.
संपूर्ण दर्शनरांगेत सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहितीचे फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटड शौचालये, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छता, अन्नदान करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंटात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविक हरिनामाच्या जयघोषाने वाटचाल करत आहेत.