पंढरपूर : वेळापूरचा गोल रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची टप्पा येथे बंधू भेट झाली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठल चा जयघोष केला. माउलींच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकऱ्यांना मानाचा नारळ प्रसाद दिला. हा बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले.
तोंडले येथून माऊलींचा पालखी सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावला. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखीचे पंढपूर तालुक्यात आगमन झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अमोल जाधव यांनी स्वागत केले.
तुकोबाराय पिराची कुरोली तर माऊली भंडीशेगावात
संत तुकारम महाराज यांची पालखी बोरगावमधून मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा... आहे पंढरीस विसावा, या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. तर माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.