Ashadhi Wari | अश्व धावला, भूमी थरारली  Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | अश्व धावला, भूमी थरारली

माऊलीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला

पुढारी वृत्तसेवा
विनोद बाबर

पानीव : याची देही याची डोळा, आज पाहिला रिंगण सोहळा, अश्व धावले रिंगणी, होता टाळ मृदुंगाचा ध्वनी! अश्वाच्या टापांवर भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा घोष, भगव्या पताका आकाशात डौलाने फडकत असताना लाखो वारकर्‍यांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा दुसरे गोल रिंगण पानीवपाटी-खुडूस येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिरसात पार पडले.

वारकर्‍यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा जयघोष होत असतानाच मैदानात माऊलीच्या पालखीने प्रवेश केला. डोळ्यांना पाझर, ओठांवर नामस्मरण आणि मनामनात उगम पावणारा नवा अध्यात्मिक उन्मेष अनुभवण्यासाठी आलेल्या प्रत्येक भाविकासाठी हा सोहळा म्हणजे पंढरीची प्रचिती ठरली. विविध फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात माऊलीची पालखी मैदानात दाखल झाली. ग्रामपंचायतीतर्फे माऊलीचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर माऊलीचा अश्व आणि मानाच्या पताकाधारी दिंड्या शिस्तबद्धरित्या मैदानात आल्या.

रिंगण सोहळ्याला भोपळे दिंडीतील मानकरी आणि चोपदारांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. स्वराचा अश्व रिंगणात घुसताच ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने आसमंत भरून निघाला. दोन्ही अश्वांनी चार फेर्‍या पूर्ण करताच रिंगणाच्या मध्यभागी असलेल्या पालखीच्या दिशेने प्रस्थान केले. त्या क्षणी अश्वाच्या पायाखालची माती लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हे द़ृश्य पाहून अनेक वारकर्‍यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. रिंगण सोहळ्यानंतर महिला व पुरुष वारकर्‍यांनी फुगड्या, पावल्या, हुतूतू, काटवट खणा अशा पारंपरिक खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. चोपदारांच्या उडी घोषणेने सर्वजण पुन्हा पालखीभोवती जमा झाले. वातावरणात माऊली... माऊली... चा नामघोष घुमत राहिला.

रिंगण वेळेआधी

यंदा रिंगण सोहळा नेहमीपेक्षा जवळपास पाऊणतास लवकर, म्हणजे आठ वाजून 40 मिनिटांनी सुरू झाला. त्यामुळे अनेक भाविक, विद्यार्थी व वयोवृद्ध वेळेत पोहोचू न शकल्याने दर्शन हुकल्यामुळे ते नाराज दिसत होते. काहींनी मात्र माऊलीची इच्छा मानून शांत प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT