सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला चार कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील ८१ ग्रामपंचायतींना लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार आहे.
पुढील महिन्यांत आषाढी वारी असून, विविध दहा मानाच्या पालख्यासह इतर पालख्या जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतीमधून जातात. त्या ग्रामपंचायतीने वारकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा द्याव्यात यासाठी ग्रामपंचायतीनुसार पाच लाख, सात ते दहा लाखांपर्यंत निधी देण्यात येणार आहे.त्यासाठी चार कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच संबंधित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिली आहे.
यंदाही वारकऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना आवश्यक सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. निधीचे वितरण झाल्यानंतर ग्रामपंचायतींकडून तातडीने विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.