वेळापूर : ‘माऊली माऊली’च्या जयघोषात वेळापूर-पंढरपूर मार्गावरील ठाकूरबुवा यांच्या समाधी मंदिराजवळ नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी अनुभवला.
बुधवारचा (दि. 2) वेळापूरचा मुक्काम आटोपून गुरुवारी (दि. 3) सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी सहा वाजता पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाला. हा सोहळा उघडेवाडी हद्दीत ठाकूरबुवा समाधी मंदिर येथे आठ वाजता पोहोचला. यानंतर सरपंच जिजाबाई गवळी, उपसरपंच अंजली सस्ते, ग्रामसेवक माने-पाटील, मंडल अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस पाटील दीपाली गोडसे, तलाठी दीपाली सूर्यवंशी, अजितसिह माने-देशमुख, तानाजी जगदाळे, रवींद्र घोरपडे, पांडुरंग कदम, डॉ. धनंजय साठे, नितीन चौगुले, भारत कोळपे, डॉ. आबासाहेब देवकते, सोमनाथ भोसले, नामदेव देवकते, बिरा देवकते, ह.भ.प. चंद्रकांत पिसे महाराज, देविदास जाधव, सुनील देवकते, बंटी भगत, मल्हारी देवकते यांनी यांनी स्वागत केले. आठ वाजून पाच मिनिटांनी पालखी रथातून उचलून संपूर्ण रिंगणाला गोल नगरप्रदक्षिणा झाली.
आठ वाजून 15 मिनिटांनी पालखी रिंगण सोहळ्याच्या मध्यभागी ठेवली. पालखीला विणेकरी, पताकाधारी, तुलशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिलांनी गोल कडे केले. यानंतर आठ वाजून 24 मिनिटांनी जरीच्या पताकाधार्यांनी पाच फेर्या पूर्ण केल्या. यानंतर पालखी सोहळा प्रमुख व चोपदार यांनी रिंगण आठ वाजून 28 मिनिटांनी लावले. माऊलींच्या अश्वानी तीन फेर्या पाऊण मिनिटात पूर्ण केल्या. यानंतर भक्तांनी टाळ्यांच्या गजरात माऊली माऊली चा गजर केला. यावेळी भाविकांनी अश्वाच्या टापाखालची माती मस्तकी लावण्यासाठी गर्दी केली. या सोहळ्यासाठी वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी भाऊसाहेब गोसावी व पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने वारकर्यांसाठी औषधोपचार डॉ. सुशांत मोरे व आरोग्य कर्मचारी यांनी केले.
वारकर्यांनी नऊ वाजून 25 मिनिटांनी पारंपरिक उडीचा, फुगडी, पावल्या, काटवट आदी खेळ सादर केले. हा गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी अनुभवला. या सोहळ्यानंतर पालखी नऊ वाजून 39 मिनिटांनी ठाकूरबुवा समाधी मंदिर पूजा आरती होऊन पालखी 10 वाजता पुन्हा रथामध्ये ठेवली. यानंतर पालखी सोहळा तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी तर टप्पा येथील माऊली व सोपानदेव यांच्या भेटी होऊन पंढरपूरच्या दिशेने भंडीशेगाव मुक्कामी मार्गस्थ झाला.