सोलापूर

Ashadhi Wari: विठुरायाच्या भेटीसाठी १४० कि मी. अंतर केले पार

वारकरी बाळासाहेब कासारे रा. जलालपूर (ता. श्रीगोंदा) हे आषाढी वारीसाठी फक्त तीनच दिवसात १४० किमी अंतर पार करुन पंढरपूरला आले आहेत

पुढारी वृत्तसेवा

मळोली : आषाढी वारी म्हटले की प्रत्येक वारकऱ्याचा आनंदाचा क्षण. यासाठी वारीच्या अगोदर आपली शेतातील सर्व कामे उरकण्यात शेतकऱ्यांची धांदल होतं असते. काही शेतकरी तशीच कामे जाग्यावर टाकून वारीसाठी निघतात. तर काही आपली कामे पूर्ण करून निघतात. असेच एक शेतकरी असणारे वारकरी बाळासाहेब कासारे रा. जलालपूर (ता. श्रीगोंदा) हे आषाढी वारीसाठी १४० किमी अंतर पार करुन पंढरपूरला आले आहेत.

स्वतःचा ट्रॅक्टर पेरणीचा व्यवसाय असल्याने पाऊस झाल्यामुळे वारीस निघताना उशीर झाला. प्रत्येक वर्षी गावातील दिंडीत येणारे बाळासाहेब या वेळेस दिंडीत येऊ शकले नाहीत. मनात खंत लागून राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सोहळा पंढरपूरच्या दिशेने समीप येत होता. मात्र घेतलेली लोकांची कामे उरकण्यात वेळ झाल्याने वारी दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली.

पायी वारी चालण्याची परंपरा खंडित होऊ द्यायची नाही, हा ठाम निश्चय मनाशी बाळगून बाळासाहेब कासारे हे जलालपूरवरून निघाले. पायी वारी चालू केली. मुखाने नाम व हाताने भजन करीत ते फक्त तीनच दिवसात १४० कि.मी.चे अंतर पार करून आज दशमीला पंढरीत दाखल झाले.

निर्व्यसनी जीवन जगणारे बाळासाहेब कासारे हे हभप बंडा तात्या यांचे शिलेदार आहेत. सदाचार व राष्ट्रकार्यात अग्रेसर असणारे बाळासाहेब म्हणजे एक निष्ठावंत वारकरी असल्याची प्रचिती आज आली. व्यसनापासून दूर रहा, असा संदेश या वारीनिमित्त त्यांनी वारीतील वारकरी बांधवांना दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT