सुरेश गायकवाड
पंढरपूर : श्री विठ्ठल-रखुमाईची पंढरी जवळ आल्याने वैष्णवांमध्ये उत्साह आहे. आषाढी यात्रेकरिता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल तसेच श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण गुरुवारी बाजीराव विहिरीजवळ रंगले. आनंदाने वारकरी विठूनामाच्या जयघोषात नृत्यमध्ये तल्लीन झाले होते. या भव्य-दिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्यांचा शीण निघून गेला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी वाखरीत दाखल झाल्या. तत्पूर्वी दुपारी १२ च्या सुमारास भंडीशेगावातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाकांचे पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने निघाले. पिराची कुरोलीतून जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी वाखरीकडे निघाली. या पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीरजवळ पार पडले.
उडाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत हे रिंगण पाहण्यासाठी वारकर्यांनी उड्डाणपुलावर प्रचंड गर्दी केली. दुपारी चार वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. या मैदानावर वारकर्यांनी फुगड्या, सूरपाट्यांच्या खेळासह भारुडांचे कार्यक्रम केले.
सायंकाळी पाचच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकर्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्यांच्या भोवतीने गोल रिंगण घातले.
पालखी सोहळे वाखरी मुक्कामी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला. शुक्रवारी वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.