पंढरपूर : आषाढी यात्रा बंदोबस्तासाठी आलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी 8 हजार पोलिस कर्मचारी सज्ज

पंढरपुरात 9 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; 14 प्रशिक्षित कार्ट पथके, 10 होडी नियंत्रक पथके

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी 6 जुलै रोजी आहे. या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 8 हजार 117 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.

आषाढी वारीत पोलिस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 8 हजार 117 पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलिस अधीक्षक, 4 अप्पर पोलिस अधीक्षक, 24 पोलिस उपअधीक्षक, 76 पोलिस निरिक्षक, 312 सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक, 4 हजार 850 पोलिस अंमलदार व 2 हजार 850 होमगार्ड तसेच 5 एसआरपीएफ कंपनी, 7 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी चार पथके, आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 14 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने 10 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातूनदेखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकर्‍यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी 14 ठिकाणी डायव्हरशन पॉईंट सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर खासगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 17 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.

अनधिकृत होर्डिंग लावल्यास छपाई करणार्‍यावर गुन्हा

पंढरपूर शहर व परिसरात तसेच पालखी मार्गावर कोणीही अनधिकृत होर्डिंग लावू नयेत. अनधिकृत होर्डिंग लावल्यास संबंधितांवर तसेच होर्डिंग छपाई करणार्‍या विरोधातही कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT