Ashadhi Wari 2026 Pudhari
सोलापूर

Ashadhi Wari 2026: आषाढी वारी पंढरीची; उलाढाल ३०० कोटींची

प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, पेढे, श्रींच्या मूर्तींची सर्वाधिक विक्री

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर: आषाढी वारीमध्ये यंदा सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली आहे. यामुळे प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, पेढे, श्रींच्या मूर्ती, कुंकू-बुक्का, हॉटेलचे पदार्थ आदी विक्रीतून सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. यंदा उशिरा का होईना चांगला पाऊस झाल्याने आषाढी यात्रेला दरवेळेपेक्षा भाविकांची संख्या वाढली आहे.

दर्शनानंतर कुंकू-बुक्का, पेढे, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो, पितळी मूर्ती, फायबरच्या मूर्ती, तुळशीमाळ, टाळ, मृदंग, वीणा, खेळणी यांना भाविकांकडून जास्त मागणी झाली. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांची कायमस्वरूपी दुकाने, हॉटेल होती; तर शहरातील स्टेशन रोड, गांधी रोड, बुरूड गल्ली रोड, चप्पल लाईन, टिळक स्मारक, गोपाळपूर रोड, संत पेठ सांगोला चौक, भोसले चौक.

सरगम चौक ते इसबाबी रोड, ६५ एकर परिसर, उपनगरीय भागातील रोडवर स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी दुकाने, स्टॉल उभारले, फेरीवाल्यांचीही गर्दी होती. ज्या अपेक्षेने माल भरला, त्या अपेक्षेने विक्रीदेखील झाली असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. गतवर्षीपेक्षा ५० कोटींची जास्त उलाढाल झाली.

गोपाळकाल्यापर्यंत मानाच्या पालख्या पंढरपुरात असतात. त्यामुळे भाविकही मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे बाजारपेठेत साहित्याची आणखी विक्री होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

यंदाच्या वारीतील प्रमुख पालख्या

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी : आळंदी (पुणे)

संत तुकाराम महाराज पालखी : देहू (पुणे)

संत गजानन महाराज पालखी : शेगाव (बुलडाणा)

संत सोपानकाका महाराज पालखी : सासवड (पुणे)

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी : त्र्यंबकेश्वर (नाशिक)

संत मुक्ताबाई पालखी : मुक्ताईनगर (जळगाव)

संत नामदेव महाराज पालखी : पंढरपूर

संत एकनाथ महाराज पालखी : पैठण (छत्रपती संभाजीनगर)

संत निळोबाराय महाराज पालखी : पिंपळनेर (अहिल्यानगर)

श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान पालखी : कौंडण्यापूर (अमरावती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT