पोखरापूर : महाराष्ट्राच्या संस्कृती विषयी, थोर संतांबद्दल, वारीच्या परंपरेबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजीत आषाढी वारी संतवेशभूषा स्पर्धेत लहान गटातून माळशिरस तालुक्यातील साईप्रसाद ओंकार गोंजारी याने संत गाडगेबाबा महाराज यांच्या केलेल्या वेशभूषेला प्रथम क्रमांक मिळवला तर मोठ्या गटातून संत जनाबाई यांच्या वेशभूषेतील मोहोळ येथील सौम्या विनीत सुतार हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संगीता नंदकुमार फाटे यांनी काम पाहिले. लहान गटातून प्रथम क्र. साईप्रसाद गोंजारी (रा. पिलीव ता.माळशिरस, संत गाडगेबाबा महाराज), द्वितीय प्रणित अमर विरपे (रा. सय्यद वरवडे ता. मोहोळ, संत ज्ञानेश्वर महाराज), तृतीय विराज अभिषेक राऊत (रा. मार्केट यार्ड, मोहोळ,संत रोहिदास), उत्तेजनार्थ शिवांश प्रथमेश आदलिंगे( रा. मोहोळ, संत सावता माळी ) मोठ्या गटातून प्रथम क्रमांक सौम्या विनीत सुतार (रा.मोहोळ,संत जनाबाई), द्वितीय राजमुद्रा शेखर भोसले (रा. कासेगाव ता.पंढरपूर,संत तुकाराम महाराज), तृतीय रजनीश भरत क्षीरसागर, निधीश भरत क्षीरसागर (रा. कातेवाडी ता. मोहोळ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज). उत्तेजनार्थ दिविशा मनोज राणे (तिसगाव, कल्याण मुंबई, संत सखुबाई) या लहान मुलांनी क्रमांक पटकाविले.
ही स्पर्धा पार पडण्यासाठी मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष ब्रह्मदेव नामदे, उपाध्यक्ष गणेश व्यवहारे, सचिव बाळासाहेब विभूते, खजिनदार सादिक तांबोळी , सहसचिव पवन शिरसकरसह खजिनदार सुनील हांडे व संघटनेतील सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
संत वेशभूषा स्पर्धेसाठी दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांकाचे 3 हजार, द्वितीय -2100, तृतीय - 1500 तर उत्तेजनार्थ - 1000 अशी चार बक्षीसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेला सोलापूर जिल्ह्याबरोबरच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.